मातृत्व आपल्यात कसे बदल घडवून आणते आणि आपली सगळीच नाती आतून आणि बाहेरूनही कसे बदलते याबाबत माहिती देणारे हे अप्रतिम पुस्तक आहे. प्रत्यक्ष माता, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक या विविध भूमिकांमधून लिहिताना हॅरिएट लर्नर यांनी अगदी विनोदी ते अत्यंत हृदयस्पर्शी अशा खूप वैयाQक्तक गोष्टी सांगितल्या आहेत. जन्म, दत्तकविधान ते रिकामे घरटे या सगळ्या टप्प्यांबाबत नर्मविनोदी शैलीत लिहिले आहे. पालकत्वाविषयीचे अतिशय समृद्ध आणि प्रामाणिक अनुभव सांगताना पालकत्वातील चुका दाखवलेल्या नाहीत, पण त्यातून मिळणारी शिकवण अतिशय सुरेख आहे. एकूण चार विभागांत मिळून मातेच्या जबाबदाऱ्यांचे चित्रण यामध्ये आहे. लर्नर यांनी निव्वळ कोरडे सल्ले दिलेले नाहीत तर वैयाQक्तक उदाहरणांमुळे त्यांचे लिखाण अधिक प्रामाणिक वाटते. प्रसंगी आई म्हणून स्वत:च्याच वर्तनावर, झालेल्या चुकांवर भाष्य करत टीकाही केली आहे. गर्भधारणा, बाळाचा जन्म, मग एक वर्षापर्यंतचा अवघड काळ! त्यामध्ये आई-बाबांची होणारी ओढाताण, कुटुंब, समाज यांचा परिणाम आणि नातेसंबंध कसे टिकवावेत याबाबत मार्गदर्शन करताना वापरलेली सहज साधी, सोपी भाषा ही लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक म्हणजे खरोखरच एक प्रकारे `मातृत्वाचा जल्लोष’ आहे.