स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पुणे या शहराभोवती, तेथील ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना, तेथील ऐतिहासिक वास्तूंची वैशिष्ट्यं, स्वातंत्र्यचळवळीतील नेत्यांचा- टिळक, आगरकर, गोखले वगैरे बिनीच्या नेत्यांचा वावर, त्या काळात त्यांची ओळख बनलेली वर्तमानपत्रे, त्यांचे वाडे, पुराण काळापासूनच प्रबळ आत्मविश्वास घेऊन वावरणारा सुधारक-शिक्षित स्त्री वर्ग, खास ओळख असणारा बुद्धिजीवी माणूस, त्याच्या वागणुकीच्या तऱ्हा या गोष्टींचं लखलखीत वलय या शहराला लाभलं आहे. नाटक-सिनेमा, गाणं, खाद्यजीवन, या प्रत्येक क्षेत्रातील त्या शहराचं खास व्यत्तिमत्त्व लक्षात घ्यावं लागतंच. विद्येचं माहेरघर म्हणवणारं हे शहर आजही शिक्षण क्षेत्राबरोबरच, उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातही विविधांगांनी झपाट्यानं रूप पालटत आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात भारतातूनच नव्हे, तर जगातील सर्व भागांतून पुण्याकडे शिक्षणासाठी, कलासाधनेसाठी, संशोधनासाठी माणसांचा ओघ वाढला आहे. त्या त्या कारणानुसार निर्माण झालेल्या संस्था-विद्यापीठे, जसे प्रभात कंपनी, बालगंधर्व रंगमंदिर याविषयी सर्वांनाच लेखक श्याम भुर्के यांच्याप्रमाणेच कुतूहल वाटतं. ‘पुस्तकंÂ मिळणाऱ्या चौकास अप्पा बळवंतांचं नाव का?`, ‘नागनाथ पारातला हा नागनाथ कोण?’ लकडी पुलावरून जाताना ‘या सिमेंटच्या पुलाला लकडी पूल का म्हणतात?` मॅजेस्टिक गप्पा, वसंत व्याख्यानमाला, सवाई गंधर्व महोत्सव, कसे सुरू झाले, टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर हे कुणाच्या पुढाकारानं उभे राहिले; तर इथं साहित्यविश्व बहरलं असेल, इथं पु.ल. राहतात, इथं ग.दि.मां.नी गीतरामायण लिहिलंय, तर कुठं अत्र्यांचं भाषण गाजलं असेल, अशा जागा अगदी गवयाच्या सुराप्रमाणे आळवत त्यांच्या मनात रुंजी घालत येतात. याविषयी जाणून घेताना गप्पांच्या ओघात अन् पुस्तकांच्या पानांत त्यांची उत्तरंही लेखकास सापडली. अशा आठवणींचं हे शब्दांकन!